Ad will apear here
Next
ग्रेस - अनुत्तरे
ग्रेस यांच्या कवितेच्या आस्वादाचे आव्हान
ग्रेस यांच्या कवितेवर लिहिणं हे चमत्कारिक आव्हान आहे. कारणांच्या वस्तुनिष्ठ तपशीलांत मी जाणार नाही. पण ते कारण आडवाटेने सांगायचा प्रयत्न करतो. त्यासाठी तसा अनुभव देणारी (त्या दर्जाची नव्हे) एक कविता रचून त्या अनुषंगाने त्यात येणारी आव्हानं उदाहरणाने दाखवायचा प्रयत्न करतो. त्यावरून कदाचित ग्रेस यांच्या कवितेवर अर्थाच्या दृष्टीने ठाशीव लिहिणं का कठीण आहे याचा अंदाज येऊ शकेल. २६ मार्च हा ग्रेस यांचा स्मृतिदिन. त्या निमित्ताने... 
............
ग्रेस यांच्या कवितेवर लिहिणं हे चमत्कारिक आव्हान आहे. कारणांच्या वस्तुनिष्ठ तपशीलांत मी जाणार नाही; पण ते कारण आडवाटेने सांगायचा प्रयत्न करतो. त्यासाठी तसा अनुभव देणारी (त्या दर्जाची नव्हे) एक कविता रचून त्या अनुषंगाने त्यात येणारी आव्हानं उदाहरणाने दाखवायचा प्रयत्न करतो. त्यावरून कदाचित ग्रेस यांच्या कवितेवर अर्थाच्या दृष्टीने ठाशीव लिहिणं का कठीण आहे याचा अंदाज येऊ शकेल. 

वठलेल्या चंद्राभवती 
शब्दांचे झुंबर फुटले 
सुकलेल्या नक्षत्रांनी 
विटलेले अंबर मिटले 

ही वाट तुझ्या मुलखाची 
जळती रक्ताची रेघ 
विच्छिन्न रत्नकाचांनी 
चिरलेले निळसर मेघ 

देहाची ओंजळ सरली 
लेऊन क्षणांची जाळी 
भिजवाया आता यावी 
यमुनेची कावड काळी 

- कौस्तुभ आजगांवकर

ही मी या विवरणासाठीच रचलेली कविता आहे. माझीच असल्यामुळे अर्थाच्या दृष्टीने ठाशीव विधानं करणं मला सोपं जाईल. 

ग्रेस यांच्या कवितेत बरेचदा काही अत्यंत वैयक्तिक संदर्भ असतात व त्यामुळे कविता समजण्यास कठीण जाते; पण तो भाग आपण सध्या सोडून देऊ. दुसरा भाग हा कल्पनेच्या पातळीवरील प्रतिमा या तशाच अनघड (raw) स्वरूपात वापरल्याने. (टीप : ही माझी वैयक्तिक मतं आहेत व ग्राह्य नसण्याची पूर्ण शक्यता आहे. असहमती, मतभेद आपण निःसंकोचपणे नोंदवालच याची खात्री आहे; पण सांगायचा भाग हा की हे विचारपूर्वक केलेलं निवेदन असलं तरी अभ्यासपूर्वक केलेलं नव्हे त्यामुळे याकडे माझी मतं अशाच दृष्टीने पाहावं.)

... तर अशा अनघड प्रतिमा जेव्हा कवितेत येतात तेव्हा त्यामागची तार्किक संगतीही अनघड व त्या कवीतील व्यक्तीच्या कल्पनेच्या पातळीवरची असते. त्या प्रतिमांची वाचकांसाठी सुसंगत मांडणी करण्याचे प्रयत्न कवीने केलेले नसतात. यामुळे बऱ्याच ओळी या मागच्या ओळीशी नातं न सांगणाऱ्या वाटतात. एका एकसंध विषयाचा प्रत्यय त्यातून येत नाही. उदाहरणादाखल मी वरची कविता घेतो. चंद्र हे सहसा बऱ्याच गोष्टींचं प्रतीक म्हणून येऊ शकतं. चर्चेसाठी आपण ते इथे प्रतिभेचं प्रतीक म्हणून वापरलं तरी चालेल. झुंबर ही एक कलात्मक रचना असते. शब्दांचं झुंबर ही कवितेचं प्रतीक म्हणून सहज वापरता येईल. त्यामुळे त्यातील शब्दांना हे लोलक किंवा रत्नकाचांचं स्वरूप मिळतं. हा कवितेचा तार्किक भाग. याचबरोबर कवी या व्यक्तीच्या मनातली ही प्रतिमा तपासली तर आकाशात फुटलेल्या झुंबराचा चुराही त्या चित्रात दिसतो - जरी तिथे प्रत्यक्ष लिहिला नसला तरी. हा कवीच्या मनातला पूर्ण प्रतिमाचित्राचा भाग आहे. 

परत कवितेकडे जाऊ. सुकलेली (चमक/प्रभा नसलेली) नक्षत्रे असली तर आकाश विटलेलंच असणार. अंबर मिटणं ही कल्पनेच्या पातळीवर घडणारी चित्रकल्पना आहे. शिवाय कवीच्या मनात अंबर याचा आकाशाखेरीज ‘वस्त्र’ हाही अर्थ असू शकतो आणि अर्थाचं ते वलय तिसऱ्या कडव्यात उमटतं. प्रत्येक ओळीचा अर्थ आता उलगडत बसत नाही. आता उडी मारून ‘विच्छिन्न रत्नकाचांनी’ या ओळीकडे येतो. वरवर पाहता असंबद्ध वाटणारी ओळ ही फुटलेल्या झुंबराच्या चुऱ्यातून आली आहे. कारण कवीच्या मनात ते चित्र पूर्णांशाने उभं आहे; पण वाचकाला त्याचा कवितेच्या शब्दांतून थांग लागू दिला नाही. अशा वेळी वाचकाला धक्का बसतो व त्याची परिणती कवितेला दुर्बोध ठरवण्यात होते. 

मेघ हे तृषा शमवणारे असतात व हा फुटका चुरा त्या मेघांनाही चिरत जातो. क्षणांची जाळी हीदेखील या अणकुचीदार काचांमुळे कालवस्त्राला पडलेल्या काल्पनिक जाळीतून उगवली आहे. आणि शेवटी जेव्हा देहाची ओंजळ सरत आली तेव्हा ती तृषा शांत करायला, वठलेपण वा सुकलेपण शमवायला यमुनेची कावड मिळावी अशी इच्छा आहे. यमुनेचा संदर्भ परिचयाचा. त्यामुळे पुन्हा ती ओळ स्वतंत्रपणे परिणाम करते; पण त्याचं आधीच्या ओळींशी असं नातं आहे. 

ग्रेसच्या काही कवितांत बरेचदा हा खेळ चालू असतो. कवीच्या मनातलं पूर्ण चित्र वाचकासमोर न उलगडल्याने वाचकाला थांग लागत नाही. थोडक्यात, मी (माझ्या कल्पनेतल्या) शिवराज्याभिषेकाचं चित्र काढलं आणि ते काळोखात ठेवून चित्रातल्या वेगवेगळ्या व्यक्तींच्या चेहऱ्यावर वा कॅनव्हासच्या वेगवेगळ्या भागांवर प्रकाशझोत सोडले तर सगळ्यांनाच ते शिवराज्याभिषेकाच्या सोहळ्याचं चित्र आहे याचा अंदाज येईल की नाही हे सांगणं कठीण आहे. तसंच या कविता कवीच्या सुप्त मनातल्या व वाचकाला अपरिचित अशा चित्राचे अंश कुठल्याही सर्वमान्य तार्किक संगतीशिवाय दाखवतात व त्यामुळे कवीला अभिप्रेत असलेला अर्थ कळायला अडचण येते. यापुढच्या गोष्टी म्हणजे शब्दांची अनपेक्षित सांगड व वरकरणी विचित्र भासणारी वाक्यरचना.  

पक्ष्याविण रुसले झाड, नदीच्या पाड, पृथ्विचे रंग..
मिथिलाच उचलते जनक, पेटता कनक, भूमिचे बंध..

या दोन ओळीतला संबंध शोधणं हे कठीण होत जातं. मिथिला, जनक, भूमी यातला परस्परसंबंध माहीत असूनही, त्यातून संगती लावणं कठीण होतं. कारण कवीच्या मनात या परस्परसंबंधाला कोणत्या प्रसंगाच्या संदर्भात उजाळा मिळतोय याचा थांग लागत नाही. ‘कवटीत मालवी दीप, स्मृतींचे पाप, लावितो आगी...’ या कडव्यात कवितेच्या ओळी सोडवून अर्थपूर्ण वाक्य सहजपणे तयार करता येत नाही. पाप या नपुंसकलिंगी शब्दापुढे आलेल्या ‘लावितो’ या पुल्लिंगी प्रयोगावर वाचक अडखळतो. 

मर्ढेकरांच्या कवितांतही असे अडखळवणारे प्रयोग आहेत; पण किंचित तर्काने योग्य क्रियापद योग्य शब्दापुढे आणता येतं. ग्रेस यांच्या कवितेत सामान्य तर्क थिटा पडतो. या साऱ्या कोड्याच्या तुकड्यांना योग्य जागी नेणारा दुवा कवितेच्या शब्दांतून मिळत नाही, तर त्यासाठी कविमनाशी वेगवेगळ्या प्रकारे एकरूप होऊन बघण्याचा अत्यंत कठीण मार्ग अनुसरावा लागतो. वेगळ्या पद्धतीने सांगायचं तर कवीने स्वतःचा कॅलिडोस्कोप एका तऱ्हेने जुळवून ठेवलाय. आता वाचकाला स्वतःचा कॅलिडोस्कोप तसाच आकृतिबंध तयार करेपर्यंत फिरवत बसायचा आहे. आस्वादाची प्रक्रिया फार कठीण आहे. 

 - कौस्तुभ आजगांवकर
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/KUARCW
Similar Posts
ग्रेस - अनुत्तरे ग्रेस यांच्या कवितेवर लिहिणं हे चमत्कारिक आव्हान आहे. कारणांच्या वस्तुनिष्ठ तपशीलांत मी जाणार नाही. पण ते कारण आडवाटेने सांगायचा प्रयत्न करतो. त्यासाठी तसा अनुभव देणारी (त्या दर्जाची नव्हे) एक कविता रचून त्या अनुषंगाने त्यात येणारी आव्हानं उदाहरणाने दाखवायचा प्रयत्न करतो. त्यावरून कदाचित ग्रेस यांच्या
सदानंद रेगे मराठी कवितेचा आनंदरसास्वाद घेताना कवी सदानंद रेगे हे नाव राहून गेलं तर तसा फार मोठा फरक पडेल असं नाही. खुद्द रेगेंनाही तसा पडला नाही.
दासबोध-ज्ञानेश्वरीचं ‘विंडो शॉपिंग’ ‘५० मार्कांना रामदास आणि ५० मार्कांना ज्ञानेश्वर आहेत ना? कसा करायचा अभ्यास?’ या प्रश्नाची आठवण झाली; कारण ‘ती’ माझ्याशी फोनवर बोलत होती. ‘एमए’ला असताना ती आणि मी एका वर्गात होतो; आणि नंतर इतक्या वर्षांत फारसा संपर्क नव्हता. ‘सध्या लॉकडाउन काळात आपण दोघी दासबोध, ज्ञानेश्वरी एकत्र वाचू या’ या तिच्या ऑफरला
प्रत्येकाने 'ही' पाच पुस्तकं वाचलीच पाहिजेत! - गौर गोपाल दास यांचा व्हिडिओ पुस्तक वाचन ही आयुष्यात किती महत्त्वाची गोष्ट आहे, हे वेगळं सांगण्याची गरज नाही. प्रत्येकाने आपल्या आयुष्यात कोणती पाच पुस्तकं वाचणं अत्यावश्यक आहे, याबद्दल आध्यात्मिक गुरू गौर गोपाल दास यांनी व्यक्त केलेले विचार...

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language